गुजरात – देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. या टप्प्यात एकूण ६५ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच नवसारीमध्ये सर्वात जास्त मतदान झालं आहे. तसेच या मतदानादरम्यान जवळपास १०० ईव्हीएम मशीन खराब झाल्या होत्या. त्यामुळे मतदानादरम्यान काहिसा गोंधळ निर्माण झाला होता. १८२ पैकी ८९ जागांसाठी हे मतदान झालं असून पटेल समाज आणि व्यापारीवर्गाचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्र व दक्षिण गुजरातचा यात समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी ही पहिली परीक्षा कठीण असल्याचं माणलं जात आहे. या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री विजय रूपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहेल, परेश धनानी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.
उर्वरित ९३ मतदारसंघांत १४ डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच या मतदानाचा निकाल १८ डिसेंबरला लागणार आहे. या पहिल्या टप्प्यात गुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या १७ टक्क्यांवर आहे. ४५ ते ५० मतदारसंघांवर पटेल समाजाचे वर्चस्व आहे.त्यामुळे भाजपसाठी यावेळची निवडणूक कठीण ठरणार असल्याचं बोललं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्या टप्प्यात तब्बल १४ सभा घेतल्या.तसेच भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांची टीम प्रचारात उतरली होती.यावरुन भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. गेली २२ वर्षे गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला दोन महिन्यांपूर्वी ही निवडणूक सोपी वाटत होती, मात्र पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरल्याचं पहावयास मिळालं. काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर, दलित नेते जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन आघाडी उभारली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे.
COMMENTS