अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो होणार होता. परंतु राहुल गांधी आणि मोदींच्या रोड शोला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. याची खबरदारी घेत पोलिसांनी ही परवानगी नाकारल्यामुळे पंतप्रधान मोदींचा मंगळवारी होणारा रोड शो रद्द करण्यात आला आहे. परंतु परवानगी नसतानाही आज पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मात्र रोड शो काढल्याचं पहावयास मिळालं आहे.
अहमदाबादमध्ये ‘लोन वोल्फ अटॅक’ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गुप्तचर यंत्रणांकडून गुजरात पोलिसांना दहशतवादी हल्ल्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मोदी आणि राहुल गांधींसह बड्या राजकीय नेत्यांना देखील रोड शोला परवानगी न देण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणांकडून देण्यात आल्या आहेत.
गुजरातमधील दुस-या टप्प्यातील मतदान 14 तारखेला होणार आहे. यासाठी राजकीय नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा रो शो रद्द झाला असला तरी परवानगी नाकारूनही पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मात्र अहमदाबादमध्ये आज रोड शो काढला आहे. या रोड शोला हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी चांगलीच गर्दी केल्याचं पहावयास मिळालं आहे.
COMMENTS