दिल्ली – काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आज सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्या हाती सोपविली आहेत. तर दुस-या बाजूला काँग्रेसचं अध्यक्षपद सोडल्यानंतर आपण निवृत्त होत असल्याचे संकेत त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिले होते. सोनिया गांधी यांनी निवृत्त होण्याचे संकेत दिल्यामुळे आता राजकारणात तर्कवितर्क लावले जात आहेत. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीची कमान प्रियांका गांधींकडे सोपवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे 2019 ची निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढवणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला पाहिजे असं मत इंदिरा गांधींचे गुरु आणि गांधी घराण्याच्या जवळचे दिवंगत गया प्रसाद यांनी व्यक्त केलं होतं. राहुल गांधी हे एकदम शांत स्वभावाचे असून त्यांना प्रियांका गांधींच्या सहकार्याची गरज असल्याचं ते म्हणाले होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. तसेच प्रियांका गांधी स्पष्ट बोलतात आणि राजकारणात बहिण भावाची ही जोडी खूप चांगलं काम करु शकते असंही ते म्हणाले होते.
त्यामुळे आता प्रियांका गांधी या लवकरच नव्या भुमिकेत दिसणार असून त्या राजकारणात कधी प्रवेश करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS