मुंबई – देशभरातील विद्यार्थी नेते उद्या मुंबईत एकाच स्टेजवर येणार आहेत. राज्यात सध्या भीमा कोरेगाव प्रकरणाचे पडसाद उमटत आहेत. याचदरम्यान गुरुवारी मुंबईत हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी दोघांनीही काल शांततेचं आवाहन केलं होतं. छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय छात्र सम्मेलनाला दोघंही उपस्थित राहणार आहेत. विलेपार्लेच्या भाईदास सभागृहात उद्या सकाळी ११ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे सम्मेलन पार पडणार आहे. या सम्मेलनात लढाऊ विद्यार्थी नेत्या रिचा सिंग, प्रदीप नरवाल, बेदाब्रता गोगई आणि छात्रभारतीचे अध्यक्ष दत्ता ढगे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
दिवसभर चालणाऱ्या या सम्मेलनात शिक्षण व्यवस्था, विद्यार्थी चळवळ आणि विद्यार्थ्यांच्या कळीच्या प्रश्नांवर विचारमंथन होणार आहे. सम्मेलनात युवा शायर फैजान अंजुम, रमणिक सिंग, मोहम्मद सदरीवाला यांचा ‘कुछ नज्मे और कुछ बाते’ असा बहारदार कार्यक्रमही होणार आहे. समारोपाच्या वेळी आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवाणी यांचा सत्कार होणार आहे. तसेच या संमेलनाला राज्यभरातून विविध कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने या सहभागी होणार आहेत.
COMMENTS