राष्ट्रगीतात बदल करून पाकिस्तानातील ‘सिंध’ शब्द काढून टाका – काँग्रेस खासदार

राष्ट्रगीतात बदल करून पाकिस्तानातील ‘सिंध’ शब्द काढून टाका – काँग्रेस खासदार

नवी दिल्ली – राष्ट्रगीतातील ‘सिंध’ शब्द काढून त्याऐवजी ‘ईशान्य भारता’चा उल्लेख करण्याची मागणी काँग्रेस खासदारानं आज राज्यसभेत केली आहे. काँग्रेसचे खासदार रिपुन बोरा यांनी ही मागणी केली असून त्याबाबत त्यांनी खासगी प्रतिनिधी ठराव राज्यसभेत मांडला आहे. राष्ट्रगीतात बदल करण्याबाबत बोरा यांनी राज्यसभेत मांडलेल्या या ठरावात तीन बाबींचा उल्लेख करण्यात आला असून स्वातंत्र्यापूर्वी रविंद्रनाथ टागोरांनी लिहिलेल्या ‘जन गण मन…’ या काव्याला स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्यात आली. स्वातंत्र्यापूर्वी भारताचा भाग असणाऱ्या ‘सिंध’ प्रांताचा यात उल्लेख करण्यात आला होता. मात्र, स्वातंत्र्यानंतर हा भाग पाकिस्तानात गेला असून तो आता भारताचा भाग राहिलेला नाही. तर, ईशान्येकडील सात राज्ये ही भारताचा महत्त्वाचा भाग आहेत. या राज्यांसंदर्भात राष्ट्रगीतात कोणताही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे ‘सिंध’ हा शब्द हटवून त्याऐवजी ईशान्य भारताचा उल्लेख राष्ट्रगीतात करण्याची मागणी खासदार रिपून बोरा यांनी केली आहे.

दरम्यान पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या भाषणाचा दाखला देत त्यांनी राष्ट्रगीतात आवश्यक ते बदल करण्यात यावेत असं म्हटलं आहे.
डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २४ जानेवारी १९५० रोजी संविधान सभेत बोलताना ‘जन गण मन’ या गीताची शब्दरचना आणि संगीताला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली होती. तसेच त्यावेळी त्यांनी भविष्यात राष्ट्रगीतातील शब्दांमध्ये बदल करण्याची परिस्थिती निर्माण झाली तर सरकारला त्याचे अधिकार असतील असंही म्हटलं होतं. त्यामुळे बोरा यांनी केलेली मागणी सरकार पूर्ण करुन राष्ट्रगीतात बदल करणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS