राज्यसभा निवडणूक, मतमोजणीला पुन्हा सुरुवात !

राज्यसभा निवडणूक, मतमोजणीला पुन्हा सुरुवात !

लखनऊ – झारखंड आणि उत्तर प्रदेशात घेण्यात आलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे निवडणूक आयोगानं मतमोजणी रोखली  होती. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाने क्रॉस व्होटिंगची तक्रार केली होती. तसेच झारखंडमध्येही जेवीएम पीचे आमदार प्रकाश राम यांनी क्रॉस व्होटिंग केल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असून पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केल्यामुळे पार्टीचे सर्वेसर्वा बाबुलाल मरांडी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यामुळे आयोगान मतमोजणी न करण्याचे आदेश दिले होते. परंतु काही वेळानंतर पु्न्हा मतमोजणीला सुरुवात झाली असून राज्यसभेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मतपत्रिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले असून बसपाच्या एका आमदाराने भाजपला मतदान केल्याचा दावा केला आहेत.तसेच सपाने नीतीन अग्रवाल यांचं आणि बसपाने अनिल सिंह यांचं मत अवैध ठरवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. या दोन आमदारांनी आपली मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटला दाखवली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान क्रॉस व्होटिंगमुळे या दोन्ही राज्यातील राजकारण तापलं आहे.

उत्तर प्रदेशात आमदारांच्या संख्येनुसार भाजपचे ८ तर सपा आणि बसपाचा१-१ उमेदवार निवडून येऊ शकतो. पण भाजपने ९ उमेदवार रिंगणात उतरवल्याने १० जागांच्या निवडणुकीत राजकारण तापलं आहे. तर झारखंडमध्ये राज्यसभेच्या दोन जागांवर मतदान घेण्यात आलं असून या दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मतमोजणीनंतरच या दोन्ही राज्यातील राज्यसभा निवडणुकांचा निकाल समजणार आहे.

 

COMMENTS