नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं पत्र लिहिलं आहे. कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे पत्र लिहिलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी लिहिलेलं पत्र……
प्रती,
मा. नरेंद्र मोदी जी
प्रधानमंत्री, भारत सरकार
नई दिल्ली
मा. महोदय,
कठुआ आणि उन्नाव येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर मी या पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. दोन्ही ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या त्या हादरवून टाकणाऱ्या आहेत. या घटनांमध्ये आरोपींना पाठीशी घालणारे सत्ताधाऱ्यांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांचे गांभीर्य वाढले आहे. ज्यावेळी सत्ताधारीच बलात्कारासारख्या घृणास्पद अपराधाच्या आरोपींना पाठीशी घालण्याचे उद्योग करु लागतात, तेंव्हा माझ्यातील आईची काळजी वाढते.
कठुआ येथील घटना हृदयद्रावक आहे. आसीफाबानू या आठ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला मंदिरात बंधक बनवून तिच्यासोबत पाशवी बलात्कार करणाऱ्या नराधमांनी नंतर तिची हत्या केली. फुलपाखराप्रमाणे खेळण्याबागडण्याच्या वयात आसीफाच्या वाट्याला आलेला मृत्यु भयंकर असाच आहे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे परंतु आरोपींच्या समर्थनार्थ विशीष्ट विचारांच्या संघटना मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील एका तरुणीवर बलात्कार करणारा तेथील सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या दारात न्याय मागण्यासाठी वडीलांसोबत गेलेल्या या तरुणीच्या वडीलांना पोलीसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांचा पोलीस कोठडीतच मृत्यु झाला. मागितला न्याय आणि मिळाला पित्याचा मृतदेह अशी करुण अवस्था या पिडितेची झाली.
मा. महोदय, आईबापांनी तळहाताच्या फोडासारख्या जपलेल्या लेकींना समाजात वावरताना मानवांतील पशूंपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांना कायद्याचा धाक असणे आवश्यक असते. काही वर्षांपुर्वी दिल्लीत घडलेले निर्भया कांड असो की कोपर्डी येथील प्रकरण. या दोन्ही प्रकरणांतील आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा झाली. आपल्या न्यायव्यवस्थेत मृत्युदंडापेक्षा कठोर शिक्षा नाही. त्यामुळे ही सर्वात कठोर शिक्षा सुनावून न्यायव्यवस्थेने लेकींना या समाजात वावरताना जर कोणी नरपशू आपल्या वासनेचे शिकार बनवित असेल तर त्याला या समाजात वावरण्याचा अधिकार नाही असे अधोरेखित केले आहे. लेकींना संरक्षण देण्यासाठी अथवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहण्याची तपास यंत्रणेची मानसिकता असेल तर बलात्कारांसारख्या घृणास्पद गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकते हे कोपर्डी आणि निर्भया प्रकरणाने सिद्ध केले आहे. अर्थात तपास यंत्रणा सक्षम करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असणेही आवश्यक आहे. कठुआ आणि उन्नाव या दोन्ही प्रकरणांत याच इच्छाशक्तीचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे. उन्नाव प्रकरणात सत्ताधारी पक्षाचाच एक आमदार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे तर कठुआमध्ये आरोपीच्या समर्थनार्थ सत्ताधाऱ्यांच्या जवळच्या असणाऱ्या संघटना मोर्चे काढतात या बाबी कोणत्याही सुज्ञ विचाराच्या माणसाला सुन्न करणाऱ्या आहेत.
या दोन्ही प्रकरणात सत्ताधारी पक्ष, त्यांचे समर्थक आणि संघटना या सर्वांनी जी भूमिका घेतली आहे ती अराजकाची नांदी ठरणारी आहे. यामध्ये माझ्यातील आईला देशातील लेकींची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. मा. महोदय, आपण गेली कित्येक वर्षांपासून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी नवरात्रीत नऊ दिवसांचा उपवास करता. स्त्रीशक्तीमध्ये दैवत्व शोधणाऱ्या आपल्यासारख्या माणसाकडून म्हणूनच मला न्यायाची अपेक्षा आहे. नरपशूंच्या अत्याचारांना बळी पडलेली आठ वर्षांची आसीफाबानू असो किंवा उन्नाव येथील पिडीता या दोन्ही या देशाच्याच लेकी आहेत. जेंव्हा आपण बेटी बचाव चा नारा देत असता तेंव्हा या लेकींच्या संरक्षणाची, संगोपनाची जबाबदारी आपल्यावरही येऊन पडते. एकप्रकारे आपण देशभरातील लेकींचे पालक असता. या न्यायाने आसीफाबानू आपलीही मुलगी होत नाही का ? तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण ठोस पावले उचलणे आवश्यक ठरत नाही का ? एरव्ही छोट्या छोट्या गोष्टींवर आपण मते व्यक्त करीत असता, मग आता आपण शांत का आहात ? आपली शांतता अराजकवाद्यांच्या पथ्यावर पडत आहे.
म्हणूनच आपल्याला मी खासदार या नात्याने नाही तर एक आई म्हणून आवाहन करते की, देशाच्या लेकींसाठी आपण काहीतरी बोला. काहीतरी कृती करा. कृपया, या नरपशूंना कठोर शिक्षा घडविण्यापासून रोखणाऱ्या शक्तींना चाप बसवा. आपण आज शांत बसलात तर या प्रवृत्ती निर्ढावतील. लेकींना समाजात वावरणं मुश्कील होऊन जाईल. आपण माझ्या विनंतीवर विचार कराल अशी मला आशा आहे.
धन्यवाद.
सुप्रिया सुळे, खासदार
COMMENTS