केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, स्मृती इराणींना झटका !

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल, स्मृती इराणींना झटका !

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. तसेच या फेरबदलामध्ये स्मृती इराणी यांना झटका बसला असून त्यांच्याकडून केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. या मंत्रालयाचा कारभार आता राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे राज्यवर्धन सिंह राठोड यांच्यावर केंद्रीय क्रीडा मंत्रिपदासोबतच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रिपदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान स्मृती इराणी यांच्याकडे असलेलं वस्त्रोद्योग मंत्रिपद कायम ठेवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानं आता अर्थमंत्रिपदाची अतिरिक्त धुरा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता पियुष गोयल यांच्यावर रेल्वे मंत्रायलयासोबतच अर्थमंत्रिपदाचा अतिरिक्त भार असणार आहे. तर एस एस अहलुवालिया यांच्याक़डील पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार काढून त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष उरलेलं असताना केंद्रीय मंत्रिमंडळात केलेल्या या फेरबदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

 

COMMENTS