मुंबई – विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीत विचित्र समिकरणे समोर आली. तसं पहायला गेलं तर राजकारणाच्या दृष्टीने ती कदाचित बरोबरही असतील. पण राजकारणाच्या बाहेर असणा-यांना आणि सर्वसामान्य जनतेला मात्र ती विचित्र वाटत आहेत. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघापुरता आपण विचार करुया. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे आणि शिवसेनेचे राजीव साबळे यांच्यात लढत झाली. इथे भाजपने उमेदवार दिला नव्हता. तर ही जागा नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला सोडली होती. राणेंनी आपली ताकद ओळखून उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी काँग्रेसवर हल्लाबोल करत पक्ष सोडला. त्याच पक्षाच्या आघाडीच्या उमेदवाराला राणेंनी पाठिंबा दिला. एकच उद्देश होता. शिवेनेचा उमेदवार हरला पाहिजे.
दुसरीकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेची जिरवण्याच्या नादात भाजपनं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिकेत तटकरेंना मदत केल्याची चर्चा आहे. अनितेक तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे चिरंजीव आहेत. त्यांना भाजपने मदत केली आहे. अर्थात उघडपणे भाजपचे नेते याबाबत काहीही बोलत नसले तरी पक्षाचे नगरसेवक नाव न सांगण्याच्या अटीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मदत करण्याचे वरीष्ठांचे आदेश होते असं सांगत आहेत. ज्या सुनील तटकरे यांच्यावर भ्रष्टाचाराची राळ उठवून 2014 मध्ये भाजपने सत्ता मिळवली. त्याच नेत्यांच्या गळ्यात गळे कसे ? असा प्रश्न आता मतदार विचारल्याशिवाय राहणार नाहीत.
भाजपच्या गेल्या साडेतीन वर्षाच्या सत्ताकाळात तटकरे किंवा अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर काय कारवाई झाली हे भाजपच्या नेत्यांनाच ठाऊक. अधून मधून कारवाई सुरू असल्याचं त्यांचेच नेते सांगातत. काही नेते तर छगन भुजबळ यांच्या शेजारील दोन खोल्या रिकाम्या असल्याचा फुसका डोस अजित पवार आणि तटकरे यांना देत असतात. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीत तटकरेंच्या मुलाला मदत केल्यामुळे आता भुजबळांच्या शेजारील रिकाम्या खोल्यांचे काय करायचे असा प्रश्न मतदाराच्या मनात पडला आहे.
(टीप छगन भुजबळ हे जामीनावर बाहेर आले आहेत. भुजबळ जेंव्हा कोठडीत होते तेंव्हाची खोली असा अर्थ घ्यावा.)
COMMENTS