पालघर – पालघरमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी प्रचार शिगेला पोहचला असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना-भाजपमध्ये याठिकाणी जोरदार सामना पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन सभा होणार आहेत. तर भाजपचे युपीतील मुख्यमत्री योगी आदित्यनाथ याचीही सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची वसई येथे जाहीर सभा होणार आहे तर भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे विरार येथे जाहीर सभा घेणार आहेत. काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील आज दुपारी विरार येथे सभा घेणार आहेत. त्यामुळे एकूणच पालघरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं असून उद्धव ठाकरे यांची सभा संध्याकाळी ६ वाजता वसईमध्ये होणार आहे. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभाही संध्याकाळी ६ वाजता विरारमध्ये पार पडणार आहे. वसई विरार पट्ट्यात उत्तर भारतीय मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजपनं योगी आदित्यनाथ यांना मैदानात उतरवलं आहे.
COMMENTS