नाशिक – जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी छगन भुजबळ यांना पत्र लिहिलं आहे. भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी 2 हजार 963 कोटींची तरतूद केली असल्याचं मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्राद्वारे छगन भुजबळ यांना कळविले आहे. राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गाच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना केली आहे. त्यासाठी पुरेशा तरतुदींसाठी छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुचना दिली होती. त्यासंदर्भात राम शिंदे यांनी पत्र पाठवलं आहे.
दरम्यान “विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने अधिसुचनेद्वारे या विभागाची निर्मिती केली आहे. परंतू, वित्तीय वर्षामध्ये नवीन लेखाशीर्ष उपलब्ध नसल्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. नवीन योजनांसाठी 2963 कोटींचा निधी आहे. ज्या योजनांमध्ये निधी अपुरा पडत असल्यास तो उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. या विभागांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. परंतु अर्थसंकल्पात त्यासाठी तुटपुंजी तरतूद केली आहे. त्यामुळे या प्रवर्गातील लोकसंख्येच्या प्रमाणात या विभागासाठी तरतूद करण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी भुजबळ यांनी केली होती. त्यावर राम शिंदे यांनी पत्राद्वारे त्यांना ही माहिती दिली आहे.
COMMENTS