नवी दिल्ली – भाजपमध्ये अस्वस्थ असलेले आणि मोदी सरकारवर नाराज असलेले खासदार काँग्रेसमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे आगामी लोकसभेची निवडणूक काँग्रेसमधून लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिल्लीतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून त्यांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी २०१९ लोकसभा निवडणूक ते भाजपकडून लढवण्यास उत्सूक नसल्यामुळे काँग्रेसकडून तिकिट मिळवण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान उत्तर पश्चिम मतदारसंघातून भाजपचे मनोज तिवारी हे खासदार आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली तर मनोज तिवारी विरुद्ध शत्रुघ्न सिन्हा असा ‘सामना’ पाहायला मिळणार आहे. तसेच याठिकाणी जयप्रकाश अग्रवाल यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. जर या जागेवर काँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली तर जयप्रकाश अग्रवाल यांना चांदनी चौकातून काँग्रेस उमेदवारी देऊ शकते असं बोललं जात आहे.
COMMENTS