मुंबई – राज्यात सुरु असलेल्या सकल मराठा समजाच्या आंदोलनावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनामधून फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. काल मुंबईमध्ये बंद पाळल्यानंतर मोर्चेक-यांनी अनेक गाड्यांवर दगडफेक केली. काही ठिकाणी बेस्ट बसेसवर दगडफेक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त जमावाने गाड्या देखील जाळल्या त्यामुळे हे सर्व घडत असताना मुख्यमंत्री फडणवीस कोठे होते? त्यांच्या सरकारने या काळात पलायन का केले, हे महाराष्ट्राला कळायला हवे, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकीयमधून विचारला आहे.
दरम्यान मोर्चेक-यांनी फोडलेल्या या गाड्यांमुळे आणि या घटनेतील नुकसानाची सर्व जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असल्याचही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. परळीमध्ये आठवडाभरापासून मराठा आंदोलक आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे निवेदन काढले असते तर ना महाराष्ट्र पेटला असता, ना काकासाहेब शिंदेंचे बलिदान गेले असते, ना नंतरचा आगडोंब उसळला असता. मराठा समाजास आरक्षण देण्याचा प्रश्न हा भावनात्मक, तितकाच प्रतिष्ठेचा बनल्यामुळे सध्याचे आंदोलन हाताळणे पोलिसांनाही कठीण झाले आहे. आंदोलकांच्या भावना किती तीव्र आहेत हे कालच्या ‘बंद’ प्रकरणात दिसले असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून म्हटलं आहे.
COMMENTS