सांगली – महापालिकेच्या स्थापनेपासून सातत्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेलेल्या सांगली महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे. एकूण 78 जागा असलेल्या सांगली महापालिकेत भाजपनं बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 41 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष विश्वाजित कदम यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित निवडणूक लढवूनही भाजपनं स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे.
गेल्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसला केवळ 15 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागांवर मिळाला आहे. स्वाभिमानी विकास आघाडीला 1 जागा मिळाली असून एका जागेवर अपक्षांचा विजय झाला आहे. तर आणखी काही जागांचे निकाल हाती यायचे आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपचा खासदार सांगलीमधून निवडूण आला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपनं चमकदार कामगिरी केली. तसंच त्यानंतर झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही जोरदार मुसंडी मारली होती. फक्त महापालिकेत सत्ता येणं बाकी होतं. तीही आता मिळवली आहे. त्यामुळे ख-या अर्थाने भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला खिळखिळा केला आहे असं म्हणावे लागेल.
COMMENTS