पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणार – खा. अशोक चव्हाण

पुढचा पंतप्रधान काँग्रेसचाच होणार – खा. अशोक चव्हाण

मुंबई – पंतप्रधान नरेंद मोदींनी आज लाल किल्ल्यावरून दिलेले भाषण हे निवडणूक प्रचाराचे भाषण होते. मोदींचे हे भाषण लाल किल्ल्यावरील शेवटचं भाषण आहे, देशाचा पुढचा पंतप्रधान काँग्रेस पक्षाचाच असेल असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ खोटे बोलतात, त्यांनी कधीतरी खरे बोलावं. चार वर्ष परदेश वा-या करण्यात व जनतेची दिशाभूल करण्यात गेली पाचव्या वर्षात तरी पंतप्रधान जनतेला सत्य सांगतील अशी अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली. डॉलरच्या तुलनेत रूपयाची ऐतिहासीक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७०.८० रुपयांवर पोहचला आहे पण पंतप्रधान त्यावर काहीच बोलत नाहीत.

पंतप्रधानांनी शेतक-यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट केल्याच्या वल्गना केल्या पण त्यांच्याच सरकारच्या कार्यकाळात देशात 45 हजारांपेक्षा जास्त व राज्यात 15 हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये विशिष्ट समाजाच्या लोकांच्या हत्या केल्या जात आहेत. दंगली घडवल्या जात आहेत. मुंबई जवळ सनातन साधकाच्या घर आणि दुकानात जिवंत बॉम्बचा साठा सापडला तरीही सनातन संस्थेवर बंदी घातली जात नाही. देशाचे संविधान जाळण्यापर्यंत समाजकंठकांची मजल गेली आहे पण सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. भाजपच्या धर्मांध जातीयवादी राजकारणामुळे राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता व लोकशाहीपुढे धोका निर्माण झाला आहे. भाजपचा धर्मांध चेहरा आता जनतेसमोर आला असून देशातील व राज्यातील जनता भाजपच्या जुमलेबाजीला बळी पडणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव करून देशात व राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

यावेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री आ. नसीम खान, खा. हुसेन दलवाई, माजी खा. भालचंद्र मुणगेकर, आ. अमर राजूरकर,  प्रदेश सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, अनुसुचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, यशवंत हाप्पे, सुभाष कानडे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रकाश सातपुते, अल नासेर झकेरिया, शाह आलम यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS