इंदापूर – इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावात शिवशाही आणि भीमशाही युवा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांनी झिंग झिंग झिंगाट’ ,’राष्ट्रवादी पुन्हा’ या गाण्यावर डान्स केला. पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, इंदापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे सभापती अशोक चोरमले आदींनी त्यांना सोबत देत तेही तरुणाईच्या घोळक्यात नाचण्यात दंग झाले. शुक्रवारी रात्री येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवासाठी आमदार भरणे, सभापती माने, अशोक चोरमले आदींनी येथे हजेरी लावली होती.
तब्बेत बरी नसतानाही आमदार भरणे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर कार्यक्रमास उपस्थित राहिले होते. दरम्यान उपस्थितांची भाषणे झाल्यानंतर आमदार भाषणाला उभे राहिले. मात्र त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना नाचण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांनी स्टेजवरून थेट खांदावर उचलून घेवूनच त्यांना नाचविले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमापूर्वी गावातच माळेवाडी भागात रामायण वाचनाचा कार्यक्रम होता या कार्यक्रमात आमदार भरणे आणि सभापती प्रवीण माने यांनी सहभाग नोंदवत रामायणाचे वाचन ही केले होते. रामायण वाचन ते झिंग झिंग झिंगाट गाण्यावर डान्स अशी आमदार भरणेंची दोन वेग वेगळी रूपे गावकर्यांना पाहावयास मिळाली… त्यामुळे आमदार भरणे यांच्या राष्ट्रवादी पुन्हां या डान्स ची सर्वत्र चर्चा होत आहे.
COMMENTS