मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्यावर मेहरबान झाले असल्याचं दिसत आहे.आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे यांच्या विरोधातील दंगलीचे सहा गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. भाजपा सरकारने भिडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवरीलही गुन्हे मागे घेतले आहेत.तसेच सरकारने शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यां विरोधात दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले असल्याची माहिती आहे.
दरम्यान राज्य सरकारने यासंदर्भात एकूण आठ परिपत्रक जारी केले असल्याची माहिती असून २००८ साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
तसेच एक जानेवारी 2018 ला कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पुणे पोलिसांनी १० सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने संभाजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती मागितली होती. त्यातून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेण्यात आले नसल्याचे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरुच असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS