पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर !

पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम जाहीर !

नवी दिल्ली –  देशातील पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम आज निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होईल. तसेच छत्तीसगढमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम  या ४ राज्यांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटचा वापरही केला जाणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी दिली आहे. तसचे मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये तर मागच्या पंधरा वर्षापासून भाजपाचे सरकार आहे. परंतु या निवडणुकीमध्ये या तिन्ही राज्यात भाजपाला प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचा सामना करावा लागणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान कर्नाटकमधील शिमोगा, बेल्लारी आणि मंड्या या मतदारसंघातील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे. या तीनही पोटनिवडणुका ३ नोव्हेंबर रोजी पार पडणार असल्याचं रावत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS