पंढरपूर – ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. त्यांनी सुनील तटकरे यांची शासकीय विश्रामगृह येथे जाऊन सदिच्छा भेट घेतली त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते असून ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत, पक्षाचे ते १० वर्षे आमदारही होते. मात्र २०१४ च्या निवडणुकीपासून परीचारकांनी राष्ट्रवादीसोबत काडीमोड घेतला आहे.
दरम्यान सोलापूर स्थानिक स्वराज संस्था, विधान परिषद निवडणुकीत त्यांचे पुतणे प्रशांत परिचारक यांनी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष विजय मिळवताना राष्ट्रवादीचे उमेदवार आणि जिल्हाध्यक्ष असलेल्या दीपक साळुंखे यांचा मानहानीकारक पराभव केला होता. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा परिषदेची सत्ताही परिचारकांच्या पुढाकाराने निसटून गेली आहे.
सध्या परिचारक कोणत्याही पक्षात नसले तरी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गोटात परिचारक सहभागी आहेत. तसेच आममदार परिचारक यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे चुलते सुधाकरपंत परिचारक यांनी थेट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या तटकरे यांची भेट घेतल्यामुळे परिचारक पुन्हा एकदा राष्ट्रवादीत सक्रीय होणार सल्याची चर्चा रंगू लागली आहे.
COMMENTS