काँग्रेसला मुंबईत धक्का, उत्तर भारतीय बडा नेता शिवसेनेत !

काँग्रेसला मुंबईत धक्का, उत्तर भारतीय बडा नेता शिवसेनेत !

मुंबई – काँग्रेसला मुंबईत जोरदार धक्का बसला असून शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली आहे. संजय निरुपम यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांनी पक्षात घरवापसी केली आहे. आज दुपारी 12 वाजता त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. ‘मातोश्री’ येथे हा पक्षप्रवेश केला. कमलेश राय यांच्या घरवापसी मागे शिवसेनेची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उत्तर भारतीय मतपेढीचं समीकरण आणि संजय निरुपम यांना शह देण्याची व्यूहरचना असल्याची चर्चा आहे. राय यांच्या पत्नी सुषमा ह्या अंधेरी पूर्व मरोळ येथील काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका आहेत.

दरम्यान कमलेश राय हे शिवसेनेचे मुंबईतील सर्वात पहिले उत्तर भारतीय शाखाप्रमुख होते. शिवसेनेत असताना संजय निरुपम यांचे ते खंदे समर्थक. निरुपम यांनी 2005 साली शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर यांनीही शिवसेना सोडली. त्यानंतर त्यांनी निरुपम यांच्याबरोबर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर 2007 मध्ये निरुपम यांनी कमलेश राय यांना महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळवून देण्यासाठी मदत केली. तेव्हा ते नगरसेवकही झाले होते. पण त्यानंतर निरुपम आणि कमलेश राय यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले होते.

2012 मध्ये महापालिका निवडणुकीत कमलेश राय यांनी केंद्रीय पक्षश्रेष्ठीबरोबर असलेला स्वतःचा संपर्क आणि गुरुदास कामत यांच्या मदतीनं उमेदवारी मिळवण्यात यश मिळवलं. ते पुन्हा नगरसेवक झाले.यंदा महापालिका निवडणुकीत अंधेरी पूर्व मरोळ येथील त्यांचा वॉर्ड महिला उमेदवारासाठी आरक्षित झाल्याने आता त्यांच्या पत्नी सुषमा या तिथं नगरसेविका आहेत.कमलेश राय हे मुंबईत उत्तर भारतीय समाजात मोठं प्रस्थ आहे. तसेच ते आर्थिक बाजूनेही मजबूत आहे.

अलीकडेच उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अयोध्यावारी केली. पण त्याचबरोबर मुंबईतील उत्तर भारतीय मतपेढीला चुचकारण्याचा प्रयत्न केला. कमलेश राय यांच्या घरवापसीमागे उद्धव ठाकरे यांची मुंबईतील उत्तर भारतीय मते मिळवणं ही व्यूहरचना आहे.त्याचप्रमाणे निरुपम यांना शह देणं हा देखील उद्देश असू शकतो असं बोललं जात आहे. तसेच काँग्रेसची संस्कृती आवडली नाही. 10 वर्षे घुसमट झाली असल्याची कबुली राय यांनी दिली आहे.

COMMENTS