अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी

दिल्‍लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्‍ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात आसाममधील एका स्‍थानिक न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेसंबंधी केलेल्या टिपण्‍णीवर केजरीवाल यांच्या विरोधात मानहानीचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. यासाठीच्या सुनावणीस केजरीवाल उपस्‍थित न राहिल्याने न्यायालयाने वॉरंट जारी केले.

 

मानहानी प्रकरणातील मागील सुनावणीच्या वेळी केजरीवाल यांनी दिल्‍ली महापालिका निवडणुकीचे कारण देत, न्यायालयाकडे वेळेचे व अनुपस्‍थित राहण्याच्या परवानगीची मागणी केली होती. मात्र ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. तरीही केजरीवाल अनुपस्‍थित राहिल्याने न्यायालयाने जामीनपात्र अटक वॉरंट जारी केले.

 

केजरीवाल यांनी केंद्रीय माहिती आयोगाला चिट्‍ठी लिहून पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले होते. तसेच पंतप्रधानांची सर्व शैक्षणिक माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. अरविंद केजरीवाल सध्या दिल्‍ली महापालिका निवडणुकीत व्यस्‍त आहेत. त्यांच्याकडून ईव्‍हीएम मशीन घोटाळ्यावरून सातत्याने आरोप केले जात आहेत. तसेच निवडणूक बॅलेट पेपरद्‍वारे घेण्याची मागणीही ते करत आहेत. त्यांनी यावरून निवडणूक आयोगावरही टीकास्‍त्र सोडले होते.  निवडणूक आयोग धृतराष्‍ट्र बनला आहे, जो कोणत्याही किमतीवर दुर्योधनाला जिंकवू इच्‍छितो, अशी टीका केजरीवाल यांनी केली होती.

 

 

COMMENTS