मुंबई – पवार घराण्यातील तिसरी पिढी म्हणजेच पार्थ आणि रोहित पवार हे आता लोकसभा आणि विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची ‘परिवर्तन यात्रेदरम्यान रोहित पवार यांच्या भाषणाला उपस्थितांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला. त्यानंतर धनंजय मुंडे भाषणाला उभे राहिले असता त्यांनी यावर भाष्य करताना, तुमच्य़ा मनातील उमेदवार देण्यासाठी आगामी लोकसभेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मोठं लीड द्या. ‘ते’ कर्जत-जामखेडमध्ये यावं असं जर तुम्हाला वाटतं असेल तर तुमचं काम तुम्ही चोख पद्धतीने पार पाडलं पाहिजे. तसेच रोहित या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो- ‘सूर्याचे पहिले किरण’, असं कौतुकही यावेळी धनंजय मुंडे यांनी रोहित पवार यांचं केलं आहे.
दरम्यान अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून पार्थ राजकारणात सक्रिय आहेत. पक्षाच्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होतात. मागील निवडणुकीमध्येही ते सक्रिय सहभागी झाले होते.
पार्थ यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला जोरदार उधाण आल्याने ‘राष्ट्रवादी’मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ आणि शिरूर मतदार संघात शिवसेनेने बाजी मारली होती. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघात ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार पराभूत झाले होते.
परंतु पिंपरी-चिंचवडच्या विकासात अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. तसेच पार्थ पवार यांना उमेदवारी दिली तर पक्षांतर्गत गटबाजी देखील रोखता येईल. त्यामुळे राष्ट्रवादीला आगामी निवडणुकीत याचा फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS