मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी घेतला होता. परंतु जागावाटपावरुन बिनसलं असल्यामुळे आता राजू शेट्टी यांनी एकला चलोची भूमिका घेतली असल्याची माहिती आहे. तसेच राजू शेट्टी यांन आगामी निवडणुकीत नऊ जागा लढवण्याची तयारी देखील सुरु केली असल्याची माहिती आहे. लोकसभेसाठी हातकणंगले, बुलढाणा, वर्धा, माढा, कोल्हापूर, सांगली, धुळे, शिर्डी, लातूर या नऊ जागांवर ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उभे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीला सहा जागांचा प्रस्ताव स्वाभिमानीनं दिला होता, त्यातील तीन जागांवर शेट्टी ठाम होते. त्यामध्ये हातकणंगले, बुलढाणा आणि वर्धा या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.राजू शेट्टी यांनी बुलढाण्याची जागा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासाठी तर वर्ध्याची जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी मागितली होती.
परंतु याबाबत ठोस चर्चा झाली नसल्यामुळे राजू शेट्टी यांनी ‘एकला चलो’ची तयारी केली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं आघाडीची स्थापना केली आहे. परंतु आता सोबत घेतलेले पक्ष दुरावले जात असल्यामुळे याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
COMMENTS