मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पुणे, नागपूरसह एकापेक्षा जास्त इच्छुक असलेल्या मतदारसंघांतील उमेदवारांचा निर्णय दिल्लीत घेतला जाणार आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या छाननी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ही अंतिम यादी तयार करण्यात आली आहे.
दरम्यान काँग्रेसच्या वाटय़ाला 2014 मधील निवडणकीत २६ जागा आल्या होत्या. परंतु आगामी निवडणुकीत पक्षाच्या वाट्याला २५ जागा येतील, अशी शक्यता गृहीत धरून काँग्रेसने ही यादी तयार केली आहे.
काँग्रेस उमेदवारांची यादी
सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), माणिकराव ठाकरे (यवतमाळ-वाशिम), मुकूल वासनिक (रामटेक), मिलिंद देवरा (दक्षिण मुंबई), खासदार राजीव सातव (हिंगोली), अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता (नांदेड), चारुलता टोकस (वर्धा) यांच्या एकमेव नावांची अ. भा. काँग्रेस समितीला शिफारस करण्यात आली. यामुळे या नेत्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.पुण्यात मोहन जोशी व अभय छाजेड यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असली तरी भाजपपासून फारकत घेणारे राज्यसभा खासदार संजय काकडे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते असा अंदाज आहे.
नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या विरोधात उमेदवार कोण असावा याचा निर्णय दिल्लीतच घेतला जाईल. धुळ्यात माजी मंत्री रोहिदास पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. लातूरमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा असून शिवराज पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील, अमित देशमुख यांनी एकत्र बसून उमेदवार निश्चित करावा, असा निर्णय घेण्यात आला.
अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकर यांना सोडण्याची पक्षाची तयारी आहे.दक्षिण मुंबईत मिलिंद देवरा तर दक्षिण मध्य- मुंबईत माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यात स्पर्धा असली तरी गायकवाड यांना उमेदवारी मिळेल, अशी शक्यता आहे. उत्तर पश्चिम मतदारसंघात संजय निरुपम हे इच्छुक असले तरी कृपाशंकर सिंह यांचेही नाव पॅनेलमध्ये समाविष्ट करण्यात आले. उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त यांनी नकार दिल्याने माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. माजी मंत्री नसिम खान आणि कृपाशंकर सिंह यांच्या नावांचा पॅनेलमध्ये समावेश करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहे.
आता या अंतिम यादीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे काय निर्णय.घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS