मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसला आजचा दिवस थोडी खुशी थोडी गम असाच असणार आहे. कारण पक्षाचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. तर भाजपचा एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील इच्छुक डॉ. भारती पवार या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दुपारी मुबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे. भारती पवार यांना भाजप दिंडोरीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार हरीशचंद्र चव्हाण यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी असल्यामुळे भारती पवार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि भाजपचे सहयोगी सदस्य संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. संध्याकाळी चारच्या सुमारास बारामतीमध्ये हा प्रवेश सोहळा होणार आहे. संजय शिंदे हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक समाजले जातात. त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस माढा लोकसभा मतादारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. संजय शिंदे हे माढ्यातून राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असं वृत्त महापॉलिटिक्सने यापूर्वीच दिलेलं आहे.
COMMENTS