कांदा उत्पादकांना अनुदान देण्यास राज्य सरकारकडून अखेर सुरुवात केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. घोषणा केल्यानंतर नऊ महिन्यांनी सरकारला अनुदान वाटपाचा मुहूर्त सापडला आहे. 2016 साली खरीप हंगामात ज्या कांदा उत्पादकांचे नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान दिले जाणार आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यासंदर्भात माहिती दिली.
येत्या जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात बाजार समितीमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे 100 रुपये अनुदान दिले जाणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी सांगितले. अनुदान देण्यात सरकारकडून मर्यादा आखण्यात आली आहे. ती म्हणजे, जास्तीत जास्त 200 क्विंटलपर्यंत अनुदान दिले जाईल. ज्या शेतकऱ्यांनी 200 क्विंटलपेक्षा अधिक कांदा उत्पादन केले आणि विक्री केली आहे, त्यांना त्यातील केवळ 200 क्विंटल कांद्यासाठीच अनुदान मिळणार आहे.
अनुदानासाठी सरकारकडून 48 ते 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील 1 लाख 25 हजार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा मिळणार आहे. शिवाय, अनुदानासाठी शेतकऱ्यांकडून आणखी अर्ज आल्यास, त्यानुसार आणखी तरतुदीचा विचार केला जाईल, असेही सुभाष देशमुख यांनी सांगितले. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड क्रमांक जोडलेले बॅंक खाते नंबर, सातबारा उतारा इत्यादी कागदपत्रे घेऊन ज्या बाजार समितीत कांदा विक्री केली असेल, तिथे अर्ज करावा लागेल.
COMMENTS