मुंबई – राजीनामा दिलेला आणखी एक काँग्रेसचा नेता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. अहमदनगरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांची भेट आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दोन दिवसांपूर्वीच ससाणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर आज या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली. मुख्यमंत्री फडणवीसांची शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज सभा होत आहे. या सभेपूर्वी त्यांनी करण ससाणे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही मात्र ससाणे हे भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा जिल्ह्यात सुरु झाली आहे.
दरम्यान करण ससाणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिला आहे. या दोन्ही घडामोडीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज संगमनेर इथं सभा होणार आहे. त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ससाणे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ही खेळी खेळून मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.
COMMENTS