मुंबई – आत्मचरित्र हे आपल्या आयुष्यात ज्या चांगल्या- वाईट गोष्टी घडल्या आहेत त्या मांडण्याचं उत्तम साधन असतं, मात्र राणेंनी आपल्या आत्मचरित्राचा वापर दुसर्यांवर आरोप करण्यासाठी केलाय. राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनाला जराही फरक पडला नाही. राणे कुठल्याच पक्षात समाधानी नसतात हे त्यांनी आत्मचरित्राद्वारे मान्य केलं असल्याची टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. तसेच राणे यांनी उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यावर आत्मचरित्रात आरोप केलेत, पण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी मांडल्या नाहीत, आपण कसे चांगले आहोत आणि दुसरे कसे वाईट आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न राणेंनी केला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणूक आणि प्रचारापासून राणे दूर गेले होते, ते कुठेही चर्चेत नव्हते, त्यांचा प्रभाव मिटला गेला, त्यामुळे प्रसिद्धी मिळण्यासाठी हे आत्मचरित्र आले आहे. राणे यात म्हणतात रश्मी ठाकरे काळजी घेतात, त्या सगळ्याच शिवसैनिकांची तशी काळजी घेतात, आम्ही त्याची जाण ठेवली, पण राणेंनी त्याची जाण ठेवली नाही. एकीकडे सांगायचे रश्मी ठाकरे माझी काळजी घ्यायच्या आणि दुसरीकडे त्यांच्यावर आरोप करायचे अशी दुटप्पी भूमिका राणेंची या आत्मचरित्रात पुढे येते. आपण लोकांवर आरोप करण्यापेक्षा श्रीधर नाईक हत्या, चेंबूरमधील दहशत, शिवसैनिकांना दिलेला त्रास याबाबत राणेंवर झालेल्या आरोपाबाबत राणेंनी आत्मचरित्रात काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. कोकणातील जनता राणेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देत होती, मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला हे त्यांनी आत्मचरित्राद्वारे समोर आणलेले नाही असंही नाईक यांनी म्हटलं आहे.
तसेच राणे यांनी सिंधुदुर्गातील राजकारणाचा आत्मचरित्रात जास्त उल्लेख केलेला नाही. मोठ्या लोकांवर आरोप करायचे आणि प्रसिध्दी मिळवायची हा त्यांचा प्रयत्न आहे. राणेंनी आत्मचरित्रात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेबांनीच राणेंना पक्षातून दूर केलं, ते कुठल्याच पक्षात समाधानी नसतात हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं आहे. राणेंनी किती आरोप केले तरी ते लोकांना पटणार नाहीत. आपल्या मुलांची काय कर्तृत्व आहेत ते त्यांनी यात लोकांसमोर आणलेले नाही.आत्मकेंद्रीत आणि स्वतः च्या फायद्यासाठी हे आत्मचरित्र लिहले आहे.
ज्या लोकांचे चरित्र, कार्यभार माहित नसेल त्यांचे आत्मचरित्र वाचायला आपल्याला उत्सुकता असते, मात्र सिंधुदुर्ग आणि राज्यातील जनतेला राणेंचा 30 ते 40 वर्षांचा सर्व कार्यकाळ माहित आहे, त्यामुळे हे आत्मचरित्र वाचण्याची उत्सुकता लोकांची नसेल अशी माझी खात्री आहे. मला राणेंचा इतिहास 30 वर्षात जो माहित आहे त्यातील वाईट गोष्टी या आत्मचरित्रात नाहीत असंही नाईक यांनी म्हटलं आहे.
COMMENTS