विधानसभेसाठी भाजपचा नवा प्लॅन, युतीत ठिणगी ?

विधानसभेसाठी भाजपचा नवा प्लॅन, युतीत ठिणगी ?

मुंबई – लोकसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्यानंतर शिवसेना-भाजपची विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभेपूर्वीच युतीचा फॉर्म्युला ठरला होता. परंतु भाजपनं आता नवा प्लॅन आखला असल्याची माहिती आहे. भाजपच्या या प्लॅनमुळे युतीत ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे. लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार मित्र पक्षांना जागा सोडून 50-50चा फॉर्म्युला ठरलेला आहे. पण, भाजपच्या नव्या प्लॅननुसार शिवसेना – भाजप 135 – 135 जागांवर लढतील. तर, मित्रपक्षांना 18 जागा देण्यात येणार असून त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा भाजपचा प्लॅन आहे. चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतच विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावरून युतीत ठिणगी पडली असल्याचं दिसत आहे.

शिवसेना – भाजपमध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी 144 -144 असा फॉर्म्युला ठरलेला होता. पण, चंद्रकांत पाटील यांच्या विधानानं आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कारण मित्रपक्षांनी जर 18 जागा या भाजपच्याच चिन्हावर लढवल्या तर, 135 आणि 153 असा नवा फॉर्म्युला तयार होणार आहे. या प्लॅनमुळे युतीत वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील घटक पक्षांनी कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घेतील असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाजपचा नेमका प्लॅन काय आणि मित्र पक्षांना हा प्लॅन मान्य होणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS