आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेचा सूचक इशारा !

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेचा सूचक इशारा !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीबाबत शिवसेनेनं पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. भाजपाशी जरी युती असली तरी शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना असून उद्याची विधानसभा भगवी करुन टाकू, त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे अशा शब्दांत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा स्वबळावर लढण्याचा सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेचा आज 53 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहे. मात्र येत्या वर्धापन दिनाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल, असा दावा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आला आहे.

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे

शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण असल्यानेच आम्ही ही 53 वर्षांची मजल मारू शकलो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारदार तलवारीच्या तेजाने तळपते आहे. गेल्या ५२-५३ वर्षात शिवसेना नावाचे वादळ महाराष्ट्रात घोंघावत आहे.
सुरुवातीला जनतेच्या अनेक छोट्यामोठ्या आंदोलनांद्वारे सुरुवात झालेल्या शिवसेनेने नंतरच्या काळात इथल्या भुमिपुत्रांच्या न्याय हक्कांचा लढा दिला. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी, पोटापाण्याच्या आणि रोजगाराच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला तेव्हा बाळासाहेब ठाकरेंवर अनेक वाऱ आणि घाव झाले. आपल्याच माणसांच्या बाजूने उभे राहणे त्यांच्यासाठी गुन्हा ठरला. आता हीच शिवसेनेची भुमिपुत्रांची भुमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी तिथल्या भुमिपुत्रांसाठी लढत आहेत. इतकेच नव्हे दक्षिणेतील प्रत्येक राज्य प्रांतीक अस्तितेचे राजकारण करीत आहेत. राष्ट्रीय पक्षही प्रादेशिक पक्षाशी युत्या-आघाडय़ाकरून आपला आकडा वाढवीत आहेत. शिवसेनाप्रमुखांनीच हा प्रांतीय अस्मितेचा विचार मांडला होता त्याला देशाने स्विकारले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सामनातून म्हटलं आहे.

COMMENTS