तुळजापूर – तुळजापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यांनी विधानसभेसाठी दंड थोपटल्याने विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे. रविवारी मुंबईत पक्षाच्या बैठकीत धुरगुडे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे ही मागणी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेंद्र धुरगुडे हे जिल्हा परिषदेतील एक प्रभावशाली नेतृत्व आहे. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी तीन वेगवेगळ्या मतदारसंघात निवडणूक लढविली आणि विजयश्री खेचूनही आणला. शिवाय जिल्हा परिषदेतही विविध प्रश्नावर अभ्यासपूर्ण मत मांडून विरोधकांना जेरीस आणले. जिल्हा परिषदेतील बाबू लोकांवरही त्यांनी तेवढाच अंकुश ठेवला आहे. जिल्हा परिषदेतील अनेक कामांमध्ये सदस्यांचे हित आडकलेले असते. मात्र धुरगुडे स्वतः ठेकेदारी पद्धतीपासून दूर असल्याने ते कधीच पदाधिकारी, अधिकारी यांच्यापुढे झुकले नाहीत. त्यामुळे स्वतःच्या मतदारसंघात निधी खेचून आणण्यात त्यांनी यश मिळविले. शिवाय शेतकऱ्यांना विद्युत पाणबुडी पंपाचे वाटप, रुग्णांसाठी आरोग्य कॅंप यामुळे त्यांचा मतदारसंघात चांगला प्रभाव आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी एक पाऊल माघार घेत जीवनराव गोरे यांचा प्रचार केला होता.
मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्या
आता मात्र त्यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडवून घेण्याची मागणी केली आहे. जर सोडवूनही मिळत नसेल तर मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी देण्याची त्यांनी मागणी केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निश्चत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता त्यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसचे विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांना बसणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान धुरगुडे यांनीही पक्षापुढे विविध पर्याय ठेवल्याने आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे धुरगुडे विरोधी कळपात सामिल होणार की पक्षासाठी उमेदवारी खेचून आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS