पुणे, शिरूर – लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा बडा नेता फोडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर फराटे यांनी आज आपल्या हाती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील पूर्व भागात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.
दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी याभागात आता जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. सुधीर फराटे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. परंतु गेल्या चार सहा महिन्यापासून दोघांमध्ये कुजबुज निर्माण झाली होती. त्यातूनच हा पक्ष प्रवेश झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर माऊली कटके हे शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक आहेत. त्यामुळे सुधीर फराटे यांच्या प्रक्ष प्रवेशाने त्यांची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे.
COMMENTS