महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते गुरुदास कामत यांनी आज (बुधवारी) दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. गुरुदास कामत यांच्या राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी, गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरुन हटवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. कामत यांच्या राजीनाम्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुदास कामतांनी अद्याप राजीनाम्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही.
येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमधील निवडणुका काँग्रेसच्या राजकीय वाटचालीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून कामत यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी ज्येष्ठ नेते गेहलोत यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.
गुरुदास कामत यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मला पक्षातील सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करावं, अशी मागणी मी स्वत: दोनवेळा राहुल गांधी यांच्याकडं केली होती. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनाही तसं पत्र लिहिलं होतं. गेल्याच आठवड्यात राहुल गांधी यांच्याशी या संदर्भात भेट घेऊन मी चर्चाही केली होती,’ असं कामत यांनी म्हटलं आहे.
“मी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, आणि राहुल गांधी यांना पक्षाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे कामत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS