महापालिका क्षेत्रात उद्या रात्रीपासून संचारबंदी

महापालिका क्षेत्रात उद्या रात्रीपासून संचारबंदी

मुंबई – ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात उद्या २२ डिसेंबरपासून ५ जानेवारी या कालवाधीत रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत महानरपालिका क्षेत्रात संचारबंदी केली जाणार आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची एक बैठक घेतली.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाइन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

 

COMMENTS