यवतमाळ – मुळची परळीची असणाऱ्या पूजा चव्हाणे पुण्यात ७ फेब्रुवारीला मध्यरात्री आत्महत्या केली. त्यानंतर तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच या तरुणीनं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जाऊ लागलं. या घटनेमागे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे आले. त्यानंतर दोन महिने राठोड गायब झाले होते. ते आज माध्यमांसमोर आले.
संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यावेळी “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला,” तुफान गर्दीत संजय राठोड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी झाली.
संजय राठोड म्हणाले, “पुण्यात तरुणीचा जो दुर्दैवी मृत्यू झाला त्याबद्दल संपूर्ण बंजारा समाजाला दु:ख झालं असून आम्ही सर्व त्यात सहभागी होतं. पण ज्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं जात आहे ते दुर्दैवी आहे. मी मागासवर्गीय कुटुंबातून असून ओबीसीचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा वाईट प्रकार सर्वांनी पाहिला आहे,” असं ते म्हणाले.
“प्रसारमाध्यमं, समाजमाध्यमं यामधून जे काही दाखवण्याचा प्रकार केला त्यात कोणतंही तथ्य नाही. याची चौकशी मुख्यमंत्र्य्यांनी लावली आहे. त्या माध्यमातून पोलीस तपास करत असून सर्व गोष्टी स्पष्ट होतील. पण गेल्या १० दिवसांपासून समाजमाध्यमं, प्रसारमाध्यमांमधून बदनामी आणि घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. पोलीस चौकशी करत असून माझं कुटुंब आणि समाजाची बदनामी करु नका,” अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
“मी १४ नाही तर १० दिवस घरी होतो. यावेळी माझ्या कुटुंबाला सांभाळण्याचं काम मी करत होते. मुंबईमधील फ्लॅटमधून शासकीय कामकाजदेखील सुरु होतं. यापुढेही कामकाज सुरु राहील. जे काही सत्य असेल ते चौकशीत बाहेर येईल,” असं संजय राठोड म्हणाले आहेत.
“मी चार वेळा निवडून आलो आहे. माझ्या समाजाचं प्रेम माझ्यावर आहे. अनेक लोक फोटो काढत असतात. मी ३० वर्ष सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता असून सर्वांना सोबत घेऊन काम केलं आहे. एका घटनेमुळे आपण सर्वजण मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका एवढीच विनंती आहे,” असं संजय राठोड यांनी सांगितलं.
COMMENTS