प्रिय सदाभाऊ, पुन्हा पत्रास कारण की……

प्रिय सदाभाऊ, पुन्हा पत्रास कारण की……

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊ खोत आणि राजु शेट्टी यांच्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाचं रुपांतर आता थेट युद्धात होण्याची शक्यता आहे. आज सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टींवर वार केल्यानंतर त्याचे पडसाद दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहेत. सोशल मीडियावर दोन्ही बाजुंनी एकमेकांची उणीदुणी काढण्याचे प्रकार सुरू आहेत. स्वाभिमानीच्या अशाच एका  कार्यकर्त्याने सहाभाऊंना लिहिलेलं हे पत्र……

 

 

प्रिय सदाभाऊ, पुन्हा पत्रास कारण की……

 

आपण “राजू शेट्टीनी बगलबच्यांना आवर घालावा अन्यथा त्यांचा बंदोबस्त करू “अशी धमकी दिली आणि सत्तेचा माज कसा असतो याचे प्रत्यंतर आम्हाला पहावयास मिळाले.

परंतु बगलबच्चे हे  मंत्र्यां- संत्र्याचे असतात स्वाभिमानीचा एक एक कार्यकर्ता वाघ आहे याचा एवढ्यात विसर पडू देवू नका. किंबहुना आपणास त्याची पूर्ण कल्पना व जाणीव असावी /आहेच. कौंग्रेस- राष्ट्रवादीच्या अख्या मंत्रिमंडळाला ज्या स्वाभिमानी फौजेला रोखता आले नाही त्या कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करणे तुमच्यासारख्याचे काम नव्हे. ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्या गाडीच्या तेलापासुन तुमच्या निवडणूक अर्जाच्या डिपोझिट पर्यंतचा भार स्वतःच्या खिशातुन सोसला त्या कार्यकर्त्यांना धमकी देवून तुम्ही कृतघ्नतेची सीमा पार केली आहे.

शेतकऱ्यांचा शिवीगाळ करून उल्लेख करणाऱ्या ‘दानवे’ची आपण पाठराखण केली आणि  एखाद्या मंत्रीपदासाठी आपण कुठल्याही थराला जावु शकता याचे स्पष्ट संकेत दिले. आपण दिलेल्या धमकीवरून आपला शेतकरी नेता ते भाजप प्रवक्ता असा  सुरु झालेला प्रवास व्हाया -सत्तेच्या जोरावर गुंडागर्दी-  येथपर्यंत येवून पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.

राजू शेट्टीनी , तुम्ही सत्तेच्या मोहापायी आंदोलनापासुन दूर गेल्याने  तुम्हाला पुन्हा मूळ प्रवाहात आणून शेतकऱ्यांचा लढा मजबूत करण्याच्या हेतूने ‘आपण पाहुण्यासारखे न येता पूर्णवेळ या आंदोलनाकरीता द्यावे’   अशी अपेक्षा व्यक्त केली त्यात चूक काय? त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद न देता भाषणचातुर्य वापरून  ‘त्यांची इच्छा नसेल तर पदयात्रेत सामील होणार नाही ‘ असे स्पष्ट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या लढ्यातून अंग काढून घेण्याची आपली खेळी लक्षात न येण्याइतपत आम्ही भाबडे नाही.

शेतकऱ्यांच्या मेहरबानीवर( हो मेहरबानीच ) मिळालेल्या मंत्रीपदाचा माज त्याच शेतकऱ्यांच्यावर उतरवू पाहताना तुम्हाला जराही संकोच वाटू नये? रावसाहेब दानवे ची पाठराखण करताना तुम्हाला स्वतःच्या पोटाला चटका देवून तुमच्या खर्चाचा भार उचलणाऱ्या शेतकऱ्यांचा विसर पडावा? एवढी काय जादु आहे त्या खुर्चीमध्ये की गेल्या २५ वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी तुमच्यावर जिव ओवाळून टाकला त्यांना वाऱ्यावर सोडून तुम्ही अगदी सहजपणे मस्तवाल सत्ताधाऱ्यांच्या टोळीत सामील होण्याचा अट्टाहास धरावा? सगळच अनाकलनीय आणि वेदनादायक आहे.

 

बेधुंद सत्ताधाऱ्यांवर आग होवून बरसणारा आमचा लाडका सदाभाउ आतून इतका पोकळ व क्षीण असू शकतो यावर विश्वास बसत नाहीये. २०-२५ वर्षे शेतकऱ्यांच्या नावाने सुरू असलेला संघर्ष केवळ राजकारण व मंत्रीपदासाठी होता ?

मोठ्या कष्टाने आणि विश्वासाने उभ्या राहिलेल्या या लढ्याचा सेनापती आपल्याच सैन्याविरुद्ध चाल करेल आणि आधुनिक विश्वास ” सत्ता विरूध्द शेतकरीसंघर्ष ” या युद्धात संपला अशी म्हण रुढ करण्याच पातक माथी घेवु नका.कृपा करून एवढा मोठा घात करु नका भाऊ.

 

शेतकऱ्यांच्या संघर्षाचा इतिहास लिहताना आमच्या सदाभाऊच नाव सत्तेपुढे लोटांगण घालणारा म्हणून न घेता ‘लढवय्या त्यागी सेनापती’ म्हणून सुवर्णाक्षरात लिहल तर आम्हास जास्त आनंद होईल. फेकून द्या ती मोहाची दोरखंडे. तुमच्या स्टार्च च्या अलीकडे अधिकच टाइट झालेल्या खादीची ताठरता गर्वापेक्षा स्वाभिमानात उतरवू द्या.

आम्ही राजू शेट्टिंचे बगलबचे नाही . आम्ही तुम्हा दोघांचेही कार्यकर्ते आहोत . आम्ही स्वाभिमानी वाघ आहोत. आमच्या बंदोबस्ताचा विषय सोडा आणि मळलेल्या वाटेवरच चालून तुम्हाला हे  मंत्रीपद मिळालेय याची जान ठेवून लाचारीच्या  नव्या वाटेवर जाण्यापेक्षा जिवाभावाच्या संवगड्यांची स्वाभिमानी पाऊलवाट पुन्हा चालु लागा. त्यावर तुमच स्वागत असेल .

 

कळावे,

तुमचाच परंतु अजूनही स्वाभिमान जिवंत असलेला कार्यकर्ता

COMMENTS