ट्रम्प यांनी मोडली 20 वर्षांची परंपरा

ट्रम्प यांनी मोडली 20 वर्षांची परंपरा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची २० वर्षांची परंपरा मोडली आहे.   वीस वर्षांमध्ये पहिलादांच अमेरिकेच्या अध्यक्षांकडून इस्लाममध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजानच्या महिन्यात इफ्तारची दावत दिली जाणार नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांच्याकडून शनिवारी (24 जून) एक पत्रक काढण्यात आले होते. या माध्यमातून ईद उल-फितर साजरा करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. रमजान महिना संपतो, त्यादिवशी मुस्लिम समुदायाकडून ईद साजरी केली जाते. व्हाईट हाऊसमध्ये दरवर्षी इफ्तार दावतचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा ट्रम्प यांच्याकडून इफ्तारचे आयोजन करण्यात आलेले नाही.

‘संपूर्ण जगभरातील मुस्लिमांसोबतच अमेरिकेतील मुस्लिम रमजानच्या पवित्र महिन्यात दान आणि पुण्य करतात. आता मुस्लिम समाजातील लोक त्यांच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत ईद साजरी करत आहेत आणि शेजारच्या लोकांसोबत इफ्तार दावतची परंपरा अद्याप कायम आहे,’ असे निवेदन डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्याकडून जारी करण्यात आले होते. मात्र या निवेदनात ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसवर इफ्तार दावतच्या आयोजनाबद्दलचा उल्लेख केलेला नाही. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची इफ्तार दावतची प्रथा मोडल्याबद्दल अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

COMMENTS