उद्यापासून बहुचर्चित जीएसटी GST देशभरात लागू होणार आहे. त्याआधीच जीएसटीच्या या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधाला आहे. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना जीएसटीची अंमलबजावणी अशक्य असल्याचं मत एका कार्यक्रमादरम्यान मांडलं होतं. त्यावेळचा व्हिडिओ काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. मोदीजी, तुम्ही तुमचेच शब्द इतक्या लवकर कसे विसरलात, असा सवालही काँग्रेसने केला आहे.
‘देशभरात करदात्यांसह माहिती तंत्रज्ञानातील पायाभूत सुविधांचा विकास जोपर्यंत केला जात नाही, तोपर्यंत जीएसटीच्या अंमलबजावणीचे स्वप्न साकार होणे कठिण आहे. जीएसटीची अंमलबजावणी शक्य नाही’, असे नरेंद्र मोदी म्हणाले होते.
हा व्हिडिओ शेअर करून काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आता भाजप कोणत्या शब्दांत उत्तर देतं, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
उद्यापासून जीएसटीची अंमलबजावणी होणार आहे. त्याची जय्यत तयारी भाजप सरकारनं केली आहे. संसदेत एका खास सोहळ्याचं आयोजन केलं आहे. त्यात उद्यापासून जीएसटी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रपती करणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. अनेक दिग्गज नेते, वरिष्ठ अधिकारी, सेलिब्रिटींना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. पण काँग्रेसनं या जीएसटी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात काँग्रेसनं आता जीएसटीवरून भाजप आणि मोदींना लक्ष्य करण्याचं ठरवलं आहे. जीएसटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काय मत होतं, याचा व्हिडिओच त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.
Modi ji how quickly you forget your own words. Why are you rolling out GST without developing the proper infrastructure #GSTTamasha pic.twitter.com/5urSMepFN3
— INC India (@INCIndia) June 30, 2017
COMMENTS