बालभारतीने यावर्षी इयत्ता नववीच्या नव्याने छापलेल्या पुस्तकात भारतीय राजकारण ढवळून काढणा-या बोफोर्स घोटाळा आणि आणीबाणी या विषयावरील धडे छापले आहेत. त्यावरून वादंग माजण्याची चिन्हे आहेत. पुस्तकात छापलेल्या राजकीय घटनांच्या उल्लेखामुळे शिक्षक संघटना नाराज असून या प्रकरणामुळे विद्यार्थाना राजकीय भ्रष्टाचार शिकवला जाणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. कॉग्रेंसने मात्र या पुस्तकावर आक्षेप घेत पुस्तकाची होळी करण्याचा निर्णय घेतला आहे.
नववीच्या या पुस्तकात 1961 ते 2000 पर्यंतच्या कालावधीतील राजकीय घडामोडींचा उल्लेख केला आहे. यामध्ये राजीव गांधी यांच्यावर असलेल्या बोफोर्स प्रकरणातील आरोपांचाही उल्लेख आहे. त्यामुळे आता सरकार बदलली की पुस्तकेही आणि इतिहासही बदलणार का असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
दरम्यान याप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेंसचे सचिव संजय बालगुडे यांनी पाठ्यपुस्तक मंडळ काँग्रेस विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप केला. तसेच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर छापल्यामुळे सोमवारी कॉग्रेंसतर्फे या पुस्तकाची होळी करणार असल्याचे सांगितले. शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांना हा आक्षेपार्ह मजकूर ताबडतोब काढण्याबाबतचे निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदानंद मोरे म्हणाले, शालेय अभ्यासक्रमात इयत्ता नववी सोबतच सातवीच्या पुस्तकातही यावर्षी बदल करण्यात आला आहे. मुलांना अभ्यास सोपा झाला पाहिजे व समजला पाहिजे या दृष्टिकोनातून इतिहास तयार करण्यात आला आहे. राजकीय लोक या अभ्यासक्रमाच भांडवल करत आहेत. 1961 ते 2000 च्या मधला काळ या पाठपुस्तकात घेतला असून यामध्ये कुठले ही राजकारण नसल्याचे बालभारती पाठपुस्तक अभ्यासक्रमाचे इतिहासाचे अध्यक्ष यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. बोफर्स व आणीबाणी मुलांना समजली पाहिजे यासाठी त्याचा उल्लेख अभ्यासक्रमात केला आहे.
बोफोर्स आणि आणिबाणी प्रकरण
1987 साली ‘बोफोर्स’ प्रकरण उघडकीस आले होते. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर बोफोर्सच्या व्यवहारात 64 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. भारताच्या संरक्षण विभागातील सर्वात मोठा आणि सर्वात गाजलेला घोटाळा म्हणून बोफोर्स घोटाळ्याकडे पाहिले जाते. तर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशातील अस्थिर परिस्थितीला शिस्त लावण्याच्या नावाखाली 25 जून 1975 रोजी देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसांबद्दल आजही इंदिरा गांधी आणि कॉंग्रेसवर टीका होत असते.
COMMENTS