मुंबई -भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन दर्शन आता महागणार आहे. पेंग्विनचे दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो पर्यटक राणीबागेच्या प्रवेशद्वारावर गर्दी करत असतात. मात्र, आता लोकांना पेंग्विन दर्शन करण्यासाठी आपला खिसा खाली करावा लागणार आहे. शिवसेना-भाजप युतीने आज महापालिका महासभेत एकमताने या शुल्कवाढीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे आता पेंग्विन दर्शनासाठी प्रतिकुटुंबाला 100 रूपये शुल्क, तर प्रौढांना 50 रूपये शुल्क द्यावा लागणार आहे.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात आणलेल्या पेंग्विनचे दर्शन 17 मार्चपासून मुंबईकरांना होऊ लागले . राणीबागेत पहिल्याच आठवड्यात पेंग्विनचे दर्शन करण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या गर्दीमुळे तेथील सुरक्षाबाबत देखील प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे राणीबागेत प्रवेशासाठी शुल्क वाढीचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात आला. शुल्क वाढ करण्याचा प्रस्ताव पालिकापुढे निवडणुकीपूर्वीच मांडण्यात आला होता. बाजार व उद्यान समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आला . यानंतर तो पुढील मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला असता, त्यावर आता महासभेने मंजुरी दिल्याने लवकरच दरवाढ लागू होणार आहे.
दरम्यान, या शुल्कवाढीला सभागृहात विरोध करणार असल्याचे सांगणा-या भाजपने शुल्कवाढीला विरोध केलाच नाही. मध्यंतरी ट्विट करून आशिष शेलार यांनी शुल्कवाढीला विरोध केला होता.
COMMENTS