नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठा आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक असल्यानं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीसाठी काय रणनिती असावी, कोणासोबत युती करावी याबाबत अंतर्गत पातळीवर काथ्याकूट सुरू आहे. काँग्रेस देशपातळीवर भाजप विरोधकांची मोट बांधण्याचा प्रय़त्न करत आहे. त्याचाच भाग म्हणून विविध राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांसोबत चर्चा करुन आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहे. आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यातही लोकसभेसाठी आघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आम आदमी पार्टीचे बंडखोर नेते आणि दिल्लीतील माजी मंत्री कपील मिश्रा यांनी याबाबत दावा केला आहे. भाजपला पराभूत कऱण्यासाठी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्याचा दावाही कपील मिश्रा यांनी केला आहे. कपील मिश्रा यांचं हे वक्तव्य आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलं आहे. तर काँग्रेसकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया अजून आली नाही.
कपील मिश्रा यांच्या दाव्यात तथ्य़ आहे किंवा नाही हे जरी माहिती नसलं तरी दोन्ही नेत्यांनी गेल्या काही दिवासांपासून केलेल्या ट्विट वरुन दोन्ही पक्ष आघाडीसाठी पोषक वातावरण तयार करत असल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी आता डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या सुशिक्षीत पंतप्रधानांची देशाला गरज आहे असं ट्विट केलं होतं. देशाचा पंतप्रधान सुशिक्षीत असावा असंही केजरीवाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे कपील मिश्रा यांचा दावा आणि नेत्यांची ट्विट यावरुन आप- काँग्रेस आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. आता नेमकं काय होतं हे पाण्यासाठी आपल्याला काही दिवस वाट पहावी लागेल.
COMMENTS