मुंबई -मागील विधानसभा निवडणुकीत युती करताना रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सहभाग देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाइंला राज्यात एक मंत्रिपद आणि एक विधान परिषदेची जागा तसेच महामंडळाची पदे देण्याचे आश्वासन दिले होते. आता विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत रिपाइंला एक जागा भाजपने देणे अपेक्षित होते.मात्र तसे न झाल्याने राज्यभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून रिपब्लिकन पक्षाची मित्रपक्षावरील नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घालणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे माध्यमांना दिली आहे.
राज्यात रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद एक विधानपरिषदेची जागा आणि महामंडळाची पदे मिळावीत यासाठीची आग्रही मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली होती.त्यावर दिल्लीत पक्षश्रेष्टींशी बोलून निर्णय घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी दिले होते. आता रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या 11 जागांपैकी 5 जागा भाजपला सहज जिंकता येणार असल्याने त्यातील एक जागा रिपाइं ला देण्यात यावी अशी आपण मागणी केली होती. मात्र आता रिपाइंला अपेक्षित विधानपरिषदेची जागा न मिळाल्याने रिपाइं मध्ये नाराजी असल्याचे ना रामदास आठवले यांनी म्हंटले आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रिपाइं ला राज्यात एक मंत्रिपद; एक विधानपरिषद सदस्यत्व आणि महामंडळाची पदे मिळाली पाहिजेत याबाबत चर्चा करणार असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.
COMMENTS