मुंबई – शिवसेनेचे नेते आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्वबळावर निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. आज शिवसेनेचा वर्धापन दिन असून या कार्यक्रमात बोलत असताना आदित्य ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. आता स्वबळावर लढायचय आणि जिंकायचही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच आजचा दिवस अभिमानाचा असून आपण कुठे होतो आणि कुठे आलो आहोत ते आपल्याला माहित आहे. ५२ वर्षात काय झगडावं लागलं आहे हे आपल्याला माहित असून आपण कोणाच्या जीवावर मोठे झालो नाहीत. राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम हे एकच हित आपलं असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान एकच आवाज आहे जो कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत घुमत आहे. तो म्हणजे अमरनाथ यात्रा असून ही यात्रा सुरु करण्यात साहेबांचा मोठा वाटा असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच अमित शाहांच्या भेटीनंतरही आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा स्बबळाचा नारा दिला असून सत्ता असताना आणि नसताना आपण जे काही करतो ते इतर कोणी करत नाही. शेतकरी, विद्यार्थी, रोजगार यासाठी शिवसेना काम करत आहे. हाडामांसाचे शिवसैनिक आपल्या पक्षात असून कार्यकर्त्यांचा रोल यामध्ये महत्त्वाचा असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान साहेबांचं एक वाक्य होतं ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण पण आपण आता १५० टक्के समाजकारण आणि तितकेच टक्के राजकारण करत आहोत. आपण जे कार्य करतोय त्या जनसेवेला मी सलाम करतो. स्वबळाचा ठराव आपण मंजूर केला असून आता आपण ठरवलंय स्वबळावर लढायचं आणि जिंकायचं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेत आपल्याला बहुमत आणावं लागणार असल्याचंही यावेळी आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
COMMENTS