नागपूर –कापसावरील बोंड अळीमुळे नुकसानीपोटी जाहीर केलेली प्रतिहेक्टरी 37 हजार 500 रूपयांची मदत तात्काळ द्या तसेच धानावरील तुड-तुड्या आणि मावा रोगामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्या या मागणीसाठी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज सुरूवातीला दोन वेळा व त्यानंतर दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले.
विधानपरिषदेचे आज कामकाज सुरू होताच धनंजय मुंडे यांनी बोंड अळी आणि धानाच्या नुकसान भरपाईचा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित केला. या विषयावर त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी सभापतींनी प्रश्नोत्तरे पुकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी सुरू केली.
त्यामुळे सभापतींनी सुरूवातीला कामकाज अर्ध्या तासासाठी तहकुब केले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाल्यावरही श्री.मुंडे यांनी हाच मुद्दा लावुन धरला. डिसेंबर 2017 च्या अधिवेशनात जाहीर केलेली बोंड अळीची नुकसान भरपाई आधी द्या, असा आग्रह त्यांनी धरला. यावेळी झालेल्या गोंधळात उपसभापतींनी पुन्हा अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब केले. त्यांनतरही हा मुद्दा सभागृहात उपस्थित झाल्याने झालेल्या गोंधळात तालिका सभापतींनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात येत असल्याची घोषणा केली.
COMMENTS