मुंबई – लोकसभा जागावाटपात काँग्रेस राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं चार जागांवरुन अजून अडलेलच आहे. मात्र त्यातही अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा होत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. गेलीत तीन वर्ष त्या मतदारसंघात त्यांनी काम सुरु केले आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादी जागा सोडण्यास तयार नाही. एवढा हा विषय राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा का केला आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
डॉ. सुजय विखे हे गेली तीन वर्ष मतदारसंघात दौरे करत आहेत. प्रत्येकवेळी बोलताना ते मी अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार पण माझं चिन्ह कुठलं असेल हे सांगता येणार नाही असं सांगत आहेत. थोडक्यात काय तर अपक्ष किंवा भाजपमधूनही मी निवडूक लढवू शकतो असं विखे वारंवार सुचीत करत आहेत. विखे यांची ही वक्तव्य म्हणज्ये एक प्रकारे राष्ट्रवादीलाच नव्हे तर काँग्रेसच्या हायकमांडलासुद्धा एक प्रकारचे आव्हानच आहे. त्यामुळेच त्यांना तिकीट देण्यास राष्ट्रवादीसोबत काँग्रेसही फारशी इच्छुक नसल्याचं बोलंल जातंय.
काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण अधून मधून ही जागा काँग्रेसला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोलत आहेत. मात्र सुजय विखे यांची गेल्या काही वर्षातील वक्तव्य, त्यांची आणि त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्री आणि भाजपशी असलेली जवळीक याची इत्यंभुत माहिती काँग्रेसच्या हायकमांडकडे गेल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच सुजय विखेंना अहमदनगरची जागा राष्ट्रवादीकडून सोडून घेण्याबाबत काँग्रेसडून मनापासून प्रयत्न होत ऩसल्याची चर्चा आहे.
दुसरीकडे विखे आणि पवार यांचे राजकीय वैर सर्वश्रूत आहे. सुजय विखे यांनी एकप्रकारे राष्ट्रवादीच्या हायकमांडलाही आव्हान दिले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. एवढच नाही तर मतदारसंघातील गणित लक्षात घेऊन काँग्रेसच्या नेत्या आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अहदमनगरमधील राजकीय गणिते झपाट्याने बदलत आहेत.
कालच प्रवरानगरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आघाडीमध्ये अन्याय होत असेल तर भाजपमध्ये जा असा आग्रह विखे पाटील यांच्याकडे धरला आहे. तर विखे पाटील यांचे राजकीय विरोधक आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिर्डीतून तुम्ही फक्त काँग्रेसचे चिन्ह लक्षात ठेवा असा सल्ला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. याचाच अर्थ विखे पाटील जर भाजपा जाऊ शकतात असा काढला जात आहे.
COMMENTS