अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीला धक्का, 12 पैकी 1 अपक्ष तर 9 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विजय!

अहमदनगर जिल्ह्यातही महायुतीला धक्का, 12 पैकी 1 अपक्ष तर 9 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा विजय!

मुंबई – कोल्हापूर, बीडनंतर आता अहमदनगर जिल्ह्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं महायुतीला धक्का दिला आहे. या जिल्ह्यातील विधानसभेच्या 12 जागांपैकी 1 जागेवर अपक्ष तर 9 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं विजय मिळवला आहे.

शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय झाला आहे. विखे पाटील यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ सुरेश थोरात याचा पराभव केला आहे. शिर्डीत भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा 87 हजार मतांनी विजय झाला आहे.

तर शेवगाव मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांनी त्यांना चांगली लढत दिली. प्रताप ढाकणे यांनी अनेकदा आघाडी घेतली. पण अखेर मोनिका राजळे यांनी 14 हजार मतांनी विजय मिळवला आहे.

तर श्रीगोंदा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घनशाम शेलार यांनी विजय मिळवला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहीत पवार यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला आहे.

तर कोपरगावमधून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या 847 मतांनी त्यांचा विजय झाला. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळेंनी विजय मिळवला. भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अनपेक्षित पराभव झाला. भाजप बंडखोर विजय वहाडणे आणि विखेंचे मेहुणे राजेश परजणे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्नेहलता कोल्हे यांना फटका बसल्याचं बोललं जात आहे.

राहुरीमधून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंचा 22 हजार मतांनी पराभव केलाय. त्यामुळे नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दमदार कमबॅक केलंय. लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीने पुन्हा उभारी घेत निर्णायक मते घेतली.
किंगमेकरची भूमिका निभावणारे भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजपला धक्का बसला आहे.

अकोलेमधून राष्ट्रवादी किरण लहामटे यांचा विजय झाला आहे. किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला. त्यामुळे राष्ट्रवादी सोडून भाजपात आलेले मधुकर पिचड यांचा मुलगा विद्यमान आमदार वैभव पिचड यांचा धक्कादायक पराभव झाला. पिचडांचा चाळीस वर्षांचा गड खालसा झाला आहे.

नेवासामधून शंकरराव गडाख यांचा विजय.झाला आहे. नेवासा विधानसभेत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजार मतांनी विजय झाला. भाजपाचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा त्यांनी पराभव केला. शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवली. गडाखांना राष्ट्रवादीच्या घुलेंनीही पाठिंबा दिला होता.

संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा विजय झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय झाला. शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा त्यांनी पराभव केला. यामुळे विखे पाटलांच्या रणनितीला अपयश आलं आहे.

श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे यांचा विजय झाला आहे. श्रीरामपूर मतदारसंघातून काँग्रेसचे लहूजी कानडे 21 हजार मतांनी विजयी झाले. काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव झाला आहे.

तर पारनेरमधून राष्ट्रवादीच्या निलेश लंके यांनी विजय मिळवला आहे. पारनेरमध्ये निलेश लंके यांनी शिवसेनेच्या विजय औटी यांचा 61 हजार मतांनी पराभव केला आहे.

अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांचा पुन्हा एकदा विजय झाला आहे.

COMMENTS