अहमदनगर : सध्या भाजपकडून सर्व नेत्या आणि कार्यकर्त्यांना अगदी ग्रामपंचायतीपासून सहकारी बॅंका असो वा क्रिकेट मंडळाची सर्व निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा आदेश दिला. त्यामुळे पक्षातील सर्व पदाधिकारी त्या आदेशाचे पालन करून पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे-पाटील या दोघांवर विळाभोपळ्याचे वैर आहे. हे सर्वश्रुत आहे. एकीकडे देशभरात भाजपविरुध्द काॅंग्रेस असे चित्र पहावयास मिळत असताना अहमदनगरमध्ये विखे-पाटील यांचे पंख छाटण्यासाठी काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी भाजपच्या नेत्यांवर बरोबर घेऊन चक्रव्युह आखले आहे.
अहमदनगर जिल्हा बॅंकेची निवडणुक होत आहे. या बॅंकेवर नेहमीच थोरात गटाचे वर्चस्व राहिले आहे. विखे व थोरात दोघेही काँग्रेसमध्ये असताना हेच चित्र होते. थोरातांना त्यावेळीही भाजपची साथ मिळत होती. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी विविध मतदारसंघातून अर्ज दाखल झाले आहेत. दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यातील एक राष्ट्रवादीची तर एक भाजप म्हणजे विखेंच्या गटाची आहे. जिल्हा बँकेवर थोरात गटाचेच कायम वर्चस्व राहिले.
यावेळीही राधाकृष्ण विखे यांची कोंडी करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे जिल्ह्यातील सर्वपक्षीय विरोधक सरसावले आहेत. ज्या भाजपच्या मदतीने विखेंनी यावेळची व्यूहरचना आखण्याचे ठरविले आहे, त्यातील काही नेतेच विरोधी आघाडीला जाऊन मिळाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. भाजपकडून माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी मंत्री राम शिंदे व विखे या तिघांची समितीची स्थापन करण्यात आली. मात्र, समितीमधील कर्डिले स्वत: थोरात यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित होते. तर भाजपच्या समितीची बैठकच अद्याप झालेली नाही. कर्डिले स्वत: उमेदवार आहेत. तेथे थोरातांच्या सोबत सहमती घडविण्याच्या बैठकीला गेले होते. त्यांच्यासोबत कोपरगावमधील भाजपचे उमेदवार विवेक कोल्हे हेही होते.
यासंबंधी कर्डिले यांना विचारले असता ते म्हणाले, ‘महसूल मंत्री थोरात यांनी फोन करून बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार आम्ही गेलो होतो. बैठकीत चर्चा झाली. भाजपच्या समितीत आपण आहोत, हे खरे आहे. मात्र, या समितीचे नेमके काम अद्याप कळालेले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी समन्वय करा, असे सांगितले होते, त्यानुसार ते केले’, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या समितीत असूनही थोरांतांच्या बैठकीला कसे गेलात या प्रश्वाचे उत्तर देताना, ‘विखेंनी आजवर घालून दिलेल्या मार्गानेच आम्ही काम करीत आहोत,’ असा टोला कर्डिले यांनी लगावला. माजी मंत्री शिंदे यांचा उमेदवारी अर्ज नाही. शिवाय त्यांनी यात फारसे लक्षही घातलेले नाही. मुळात भाजपचे हे सर्व पराभूत आमदार विखेंवर नाराज आहेत. विधानसभा निवडणुकीत विखे यांनी खेळ्या करून आपला पराभव केल्याचा उघड आरोप या आमदारांनी केला होता.
COMMENTS