पाटणा – बिहारची राजधानी पाटणामध्ये लागलेले काही पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. राष्ट्रीय जनता दलाच्या वर्धापन दिनानिमित्त लागलेल्या या पोस्टरमुळे बिहारच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव यांच्या पत्नी ऐश्वर्या राय यांना पक्षाच्या पोस्टरवर स्थान मिळालंय. राबडी देवी आणि मिसा भारती यांच्यामध्ये ऐश्वर्या राय यांचा फोटो आहे. त्यामुळे ऐश्वर्या राय याही राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा बिहारच्या राजकारणात रंगू लागली आहे. अर्थात राष्ट्रीय जनता दलाकडून याबाबत अजूनही काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काही दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुलांमध्ये वाद असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर कोणताही वाद नसल्याचं स्पष्टीकरणही दोघांनी दिलं आहे. मात्र तरीही तेजप्रताप राजकारणातून संन्यास घेणार अशाही चर्चा आहेत. त्यापार्श्वभूमीवर या पोस्टरला महत्व आलं आहे. तेजप्रताप यादव यांनी काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या राय या राजकारणात येणार नाही असं स्पष्ट केलं होतं. मात्र राय याही बिहारमधील एका बड्या राजकारण्याची मुलगी आहे. त्यांना राजकारणाचे बाळकडू लहानपणापासून घरातच मिळाले आहेत. त्यामुळे त्या राजकारणात येऊ शकतात अशीही चर्चा पाटण्यामध्ये रंगू लागली आहे.
COMMENTS