मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. त्यांच्या प्रवेशानंतर मराठवाड्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा फायदा होणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
इथून पुढच्या काळात विकासाचे प्रश्न पुढे नेण्यासाठी आपल्याला सहकार्य करु असे आश्वासन देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत केले. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला आता जयसिंगराव गायकवाड यांचा पक्षप्रवेश होत आहे असेही अजित पवार यांनी सांगितले. सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याचं काम यशवंतराव चव्हाणसाहेबांनी केले तेच काम पुढे पवारसाहेब करत आहेत असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून प्रवेश केलेल्या जयसिंगराव गायकवाड यांचे पक्षात स्वागत – जयंत पाटील
भाजपच्या जाचाला, त्रासाला कंटाळून जयसिंगराव गायकवाड प्रवेश करत आहेत. त्यांचे राष्ट्रवादी पक्षात स्वागत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढत आहे. प्रत्येकाने ताकदीने पक्ष वाढवला आहे. जयसिंगराव गायकवाड भाजपात काम करत होते. मात्र भाजप जनतेच्या हिताची कामे करत नाही. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा राष्ट्रवादीत दाखल होत आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. सामान्य माणसाशी जिव्हाळा असणारा नेता आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
पश्चिम महाराष्ट्रासारखी ताकद मराठवाड्यात निर्माण करु – धनंजय मुंडे
पश्चिम महाराष्ट्रात जशी ताकद राष्ट्रवादीची आहे त्याच ताकदीची राष्ट्रवादी मराठवाड्यात जयसिंगराव गायकवाड यांच्या प्रवेशाने निर्माण होईल असा विश्वास सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. मला मनापासून आनंद आहे. काकांच्या प्रवेशाने बीड जिल्हयात व मराठवाडयात हत्तीचं बळ मिळाले आहे असेही धनंजय मुंडे म्हणाले.
COMMENTS