अजित पवारांचा क्रीडा मंत्र्यांना फोन, ‘त्या’ खेळाडूंना न्याय द्या !

अजित पवारांचा क्रीडा मंत्र्यांना फोन, ‘त्या’ खेळाडूंना न्याय द्या !

परभणी –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन केला आहे. थ्रोबॉल खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी विनोद तावडेंकडे केली आहे. हल्लाबोल यात्रेदरम्यान परभणीतील थ्रोबॉलच्या खेळाडूंनी अजित पवारांची भेट घेऊन आपल्या अडचणी त्यांच्यापुढे मांडल्या आहेत. त्यावेळी सरकारकडून वैधता प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी त्यांनी थेट अजित पवारांकडे केली आहे. त्यामुळे अजितदादांनी या खेळाडूंसमोरच क्रीडामंत्री विनोद तावडेंना फोन लावून या खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. या प्रमाणपत्रामुळे शासकीय नोकरीतील पाच टक्के आरक्षणासाठी या खेळाडूंना अर्ज करता येणार आहे.

दरम्यान ऑलम्पिक, एशियन आणि कॉमनवेल्थ खेळाव्यतिरीक्त इतर खेळांना, खेळाडूंना वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही असा जीआर १ जुलै २०१६ रोजी शासनाने काढला आहे. शासनाच्या या अजब निर्णयाविरोधात परभणीतील गौरव क्रिडा मंडळातील थ्रोबॉल खेळाडूंच्या शिष्टमंडळानं अजित पवारांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी शासनाच्या जीआरचे आम्ही स्वागतच करतो. मात्र जे खेळाडू २०१६ पूर्वीपासून १० ते १५ वर्षांपासून एकच खेळ खेळत आहे, त्यांच्यावर हा अन्याय आहे. त्यामुळे २०१६ पूर्वीपासून जिल्हा व राज्य स्तरावर जे खेळाडू खेळत आहेत, त्यांना खेळाडू वैधता प्रमाणपत्र द्यावे. जेणेकरून शासकीय नोकरीसाठी आम्हाला अर्ज करता येईल अशी मागणी त्यांनी केली आहे.

आघाडी सरकारच्या काळात २००५ च्या जीआरमध्ये ४२ खेळांच्या खेळाडूंना शासकीय नोकरीसाठी खेळाडू वैधता प्रमाणपत्र देण्यात येत होते. परंतु १ जुलै २०१६ च्या जीआरनुसार ४२ पैकी फक्त २८ खेळांनाच पात्र करण्यात आले आहेत. त्या खेळांमध्ये थ्रोबॉलचाही समावेश आहे. त्यामुळे या खेळाडूंनी आपली मागणी अजितदादांपुढे करताच त्यांनी तात्काळ क्रीडामंत्री विनोद तावडे यांना फोन करुन याबद्दल माहिती दिली असून तावडे यांनीही दादांना सकारात्मक प्रतिसाद देत या विषयात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.

COMMENTS